प्रतिनिधी
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दागिने चोरल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या कोल्हापुरच्या आहेत. त्या शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातून कोल्हापुरकडे निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर पती आणि जावई होते.
बस फलाटावर थांबल्यानंतर प्रवाशांची गर्दी झाली. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बसमध्ये महिलेने प्रवेश केला. पिशवीची पाहणी केली. तेव्हा दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.
दिवाळीनंतर स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी एसटी प्रवाशांकडील लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.