पगाराच्या वादातून हॉटेल मालकाचा खून

क्राईम

प्रतिनिधी

पुणे शहरात पगाराच्या वादातून झालेल्या भांडणाने थरारक वळण घेतले आहे. कोण्धवे धवडे परिसरातील पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट मध्ये मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत हॉटेल मालक संतोष सुंदर शेट्टी (वय 45) यांचा त्यांच्या हॉटेलमधील वेटर उमेश दिलीप गिरी (वय 38) याच्यासोबत पगारावरून वाद झाला. मालक वारंवार काम व्यवस्थित करण्यास सांगत असल्याने संतापलेल्या वेटरने अचानक किचनमधील चाकू उचलून शेट्टी यांच्यावर तुटून पडला. आरोपीने मानेवर व छातीवर वार करत शेट्टी यांना गंभीर जखमी केले.

गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी आरोपीला पळून जाण्यापासून रोखले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. कोंढवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हॉटेल व्यवसायात कामगार व मालक यांच्यातील वाद किती भीषण रूप धारण करू शकतो, याचा हा धक्कादायक नमुना असल्याची चर्चा रंगत आहे.