प्रतिनिधी
३१ डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस. या दिवशी मद्यप्राशन करून सरत्या वर्षाला निरोप देणारी तरुणाई एकीकडे तर गेली दहा वर्षे दारू नको दूध प्या म्हणत समाज प्रबोधन करणारा अवलिया दुसरीकडे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावातील अनिल खोमणे नावाचा तरुण गेली दहा वर्षे व्यसनमुक्तीचे काम अखंडितपणे करत आहे. राम कृष्ण हरी या टोपणनावाने पंचक्रोशीत परिचित असलेले खोमणे युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन व्यसनमुक्तीचे काम करत आहेत. गेली दहा वर्षे दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा या अंमली पदार्थापासून तरुणाईला रोखण्याचे काम करत आहेत.
यावर्षी अनिल खोमणे यांच्या उपक्रमाला गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी साथ दिली आहे. लोकांनी स्वयंस्फूर्तीने दूध दिले आहे. कोऱ्हाळे बुद्रुक बस स्थानकासमोर हा उपक्रम पार पडला.













