प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात बुधवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बंटी (असलम शब्बीर) जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, बंटी जहागीरदार हे नातेवाईकासोबत दुचाकीवरून कब्रस्तान परिसरातून परत येत असताना दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. हल्ल्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या. नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
बंटी जहागीरदार हे २०१२ साली पुण्यात झालेल्या जे.एम. रोड साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी म्हणून चर्चेत होते. त्या प्रकरणात शस्त्रपुरवठ्याशी संबंधित आरोपांखाली त्यांना अटक झाली होती. सध्या ते जामिनावर बाहेर होते. त्यांच्या पार्श्वभूमीमुळे या हत्येमागे जुना वाद, गुन्हेगारी संघर्ष किंवा वैयक्तिक वैमनस्य असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
















