प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर येथील इंदिरा गांधी तांत्रिक विद्या निकेतन येथे महिलांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर ३० डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
या उपक्रमांतर्गत महिलांसाठी सर्वसाधारण आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील साखर, ईसीजी, एको तपासणी, शरीरातील चरबीचे प्रमाण, फिजिशियन कन्सल्टेशन तसेच डर्माटोलॉजी संदर्भातील तपासण्या करण्यात आल्या. यासोबतच मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आले.
या शिबिरासाठी परिसरातील सुमारे ३५० महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये १२० महिलांची नेत्रतपासणी, ५५ रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी निवड, तसेच २८ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. एकूण १६५ महिलांनी सर्वसाधारण महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली.
हा उपक्रम इंदिरा गांधी तांत्रिक विद्या निकेतन, साई सेवा हॉस्पिटल आणि दिपउजळ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे व त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या काकडे – यांनी महिलांचे आरोग्य व शिक्षण समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. संस्थेचे सचिव मा. श्री. नितीन कुलकर्णी यांनी संस्थेची माहिती व प्रास्ताविक केले.
या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री गिलरे, डॉ. निता शिंगटे, डॉ. शामा केंजळे, डॉ. संध्या ढवळकर आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून महिलांना योग्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मु.सा. काकडे कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. जया कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राहुल गोळवे, दिपउजळ फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक दिपक साखरे, सचिव संदीप गायकवाड, संस्थेचे संचालक मा. श्री. संजय घाडगे यांच्यासह मान्यवर, शिक्षक, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेच्या संचालिका सौ. उज्वला लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. मृणालिनी मोहिते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कर्मचारी सौ. सारिका जगताप, सौ. राणी काकडे, सौ. सना बागवान, सौ. सुषमा देवकर, चंद्रकांत पवार यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार संचालिका सौ. उज्वला लोखंडे यांनी मानले













