मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 2 September 2026

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 13, 2026 1 मिनिट वाचन 8,511 वाचन

प्रतिनिधी 

राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी या जागांसाठी मतदान पार पडणार असून, अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच ७ फेब्रुवारीला गुलाल उधळला जाईल.

निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे:

अर्ज भरण्यास सुरुवात:१६ जानेवारी २०२६
अर्ज भरण्याची शेवटची तारीख:२१ जानेवारी २०२६
अर्जांची छाननी: २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारी घेण्याची मुदत: २७ जानेवारी (दुपारी ३ वाजेपर्यंत)
रणधुमाळी सुरु (चिन्ह वाटप):२७ जानेवारी (दुपारी ३:३० नंतर)
मतदानाचा दिवस: ५ फेब्रुवारी (सकाळी ७:३० ते ५:३०)
निकाल: ७ फेब्रुवारी (सकाळी १० वाजेपासून)

निवडणुकीचा ‘डाटा’ एका नजरेत:

एकूण मतदार: २.०९ कोटी (पुरुष: १.०७ कोटी | महिला: १.०२ कोटी)
मतदान केंद्रे: २५,४८२

निवडून द्यायचे सदस्य:

जिल्हा परिषद: ७३१ जागा (महिलांसाठी ३६९ राखीव)
पंचायत समिती:१४६२ जागा (महिलांसाठी ७३१ राखीव)
खर्च मर्यादा:५.२५ लाख ते ६ लाख रुपये (विभागांनुसार)

​यावेळच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षणासह मोठे प्राधान्य मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांपैकी तब्बल ३६९ जागांवर महिला उमेदवार आपले नशीब आजमावतील. तसेच ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), अनुसूचित जाती आणि जमातीसाठीही नियमानुसार जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण तापणार असून, महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनीही आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उमेदवारी कोणाला मिळणार आणि ग्रामीण भागाचा गड कोण राखणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख