प्रतिनिधी
निंबुत–कांबळेश्वर (ता. बारामती) जिल्हा परिषद गटातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अभिजीत सतीशराव काकडे हे मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत असून, सहकार क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
अभिजीत काकडे हे सुशिक्षित, तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शिक्षणाबरोबरच सहकार, शेती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांचा त्यांचा सखोल अभ्यास असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.
निंबुत–कांबळेश्वर जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या गटामध्ये शेती, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांचा मोठा प्रभाव असून, सक्षम व अभ्यासू नेतृत्वाची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अभिजीत काकडे यांचे नाव पुढे येत असल्याने स्थानिक पातळीवर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
तरुण वर्ग, शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सामाजिक उपक्रम, ग्रामीण विकासाशी संबंधित कामे आणि सहकारातील अनुभव यामुळे ते सर्वसामान्य जनतेशी थेट जोडले गेले आहेत. विशेषतः शेतीमालाला योग्य दर, पाणीप्रश्न, युवकांना रोजगाराच्या संधी आणि गावपातळीवरील विकासकामे या मुद्द्यांवर ते ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तसेच समाजातील वंचित,शोषित लोकांना नेहमी सरळ हाताने मदत करणे हा त्यांचा स्वभाव गुण आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. निंबुत–कांबळेश्वर गटात कोण उमेदवार असेल, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असतानाच अभिजीत सतीशराव काकडे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, अभिजीत काकडे मैदानात उतरल्यास निंबुत–कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात सक्षम, सुशिक्षित आणि सहकाराचा अनुभव असलेले नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












