प्रतिनिधी.
नींबूत (ता. बारामती) येथील पंचायत समिती गणातून आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मदनराव काकडे हे उमेदवारीच्या शर्यतीत उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले मदनराव काकडे यांनी सामाजिक, सहकार आणि विकासात्मक कामांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
नींबूत पंचायत समिती गण हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, या गणातून राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम उमेदवार देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर मदनराव काकडे यांच्या नावाची जोरदार चर्चा पक्षांतर्गत पातळीवर सुरू आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका, विविध सामाजिक उपक्रमांतील सहभाग आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांना कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः नींबूत परिसरातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य विषयक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
दरम्यान, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार कोण असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मदनराव काकडे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठी अंतिम शिक्कामोर्तब करतात का, याबाबत उत्सुकता आहे.
जर त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली, तर नींबूत पंचायत समिती गणात निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.












