प्रतिनिधी
बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी कपिलधारवाडी परिसरात त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये आढळला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी रात्रीपासून ते बेपत्ता असल्यामुळे त्यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यालयीन त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
सचिन नारायण जाधवर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चुंबे गावचे रहिवासी होते. तीन वर्षांपूर्वी पदोन्नतीनंतर त्यांची बदली बीड येथे झाली आणि ते येथे जीएसटी कार्यालयात राज्य कर निरीक्षक अधिकारी म्हणून कार्यरत होते. मागील काही महिन्यांपासून कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास होत असल्याची माहिती पोलिसांकडे मिळाली आहे. शुक्रवारी रात्री ते घरी न सांगता बाहेर गेले होते. नंतर ते घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता शनिवारी दुपारी कपिलधारवाडी परिसरातील कमानीजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. पोलीसांनी त्यांच्या कारची झडती घेतली असता गाडीमध्ये एक सुसाइड नोट देखील आढळून आली आहे, ज्यात त्यांनी वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला असल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले की, आरोपी अधिकारी पोलीसांच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती आणि तपास सुरू ठेवला आहे.




















