मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

mnewsmarathi 01 Jul 2026 1 मिनिट वाचन 8,594 वाचन

सहसंपादक- अक्षय थोरात

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव पोलिसांनी अवैध गुटखा विक्री व साठवणुकीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. बारामती तालुक्यातील मेढद गावच्या हद्दीत धाड टाकून पोलिसांनी ३ लाख ५७ हजार ३२१ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे.

माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मेढद येथील रामदास बाळू मोरे याने आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर साठवणूक केली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) पुणे कार्यालयाचे अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांच्याशी संपर्क साधून मेढद गावातील मोरेवाडी येथील शेती गट नंबर ५७४ मधील आरोपीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना साडेतीन लाखांपेक्षा जास्त किमतीचा सुगंधी तंबाखू, गुटखा आणि पानमसाला मिळून आला.

​

या प्रकरणी मुख्य आरोपी रामदास बाळू मोरे (रा. मेढद, ता. बारामती) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा माल गौरव जोगदंड (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) आणि गणेश मदने (रा. बारामती) यांच्याकडून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला ४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, तसेच पोलीस अंमलदार विजय बापमोडे, राहुल पांढरे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, भैरवनाथ बोराटे, सागर शिंदे, जयसिंग कचरे, अमोल कोवरे, अमोल वाघमारे, धिरज कांबळे आणि सागर पवार यांच्या पथकाने बजावली. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi