प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरणाऱ्या व धोकादायक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या निशांत ऊर्फ भैया आप्पाजी मदने (वय २४, रा. कऱ्हावागज, ता. बारामती, जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती इत्यादींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील सराईत व धोकादायक गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निशांत मदने याच्याविरुद्ध यापूर्वी २०२३, २०२४ आणि २०२६ या कालावधीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
त्याच्याविरुद्ध विनयभंग, इतरांच्या जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षेस धोका निर्माण करणारी कृत्ये, जबर दुखापतीची भीती दाखवून बलपूर्वक नुकसान करणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे तसेच खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविण्यात आला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशान्वये निशांत मदने याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार माळेगाव पोलिसांनी पथके तयार करून शोध घेतला आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याला ताब्यात घेऊन अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.
