प्रतिनिधी
सोरटेवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीत नीरा-बारामती राज्यमार्गावर पवार वस्ती बसस्टॉपजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पायी चालणाऱ्या व्यक्तीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५४ वर्षीय पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकास सिताराम जगताप (वय ५४, रा. साळोबा वस्ती, मुरूम, ता. बारामती, जि. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री ८:४६ वाजण्याच्या सुमारास विकास जगताप हे सोरटेवाडी गावच्या हद्दीतील पवार वस्ती बसस्टॉपजवळ नीरा-बारामती राज्यमार्गावरून पायी चालत जात होते. त्यावेळी करंजेपूल चौकाकडून वडगाव निंबाळकरच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना भीषण धडक दिली.
या अपघातात जगताप यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाघळवाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री ९:५८ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ व १७७ नुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वारुळे करत आहेत.
