मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Saturday, 24 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

आध्यात्मिक जागृतीचा संदेश देत ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

mnewsmarathi 24 Oct 2026 1 मिनिट वाचन 4,032 वाचन

 

प्रतिनिधी

 “वास्तविक जागृती तेव्हाच येते, जेव्हा मनुष्य प्रत्येक क्षणी परमात्म्याच्या अस्तित्वाची अनुभूती घेत आध्यात्मिकता आपल्या जीवनात अंगीकारतो.” हे प्रेरणादायी उद्गार सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या प्रथम दिवशी मानवतेच्या नावाने संदेश देताना व्यक्त केले.

२३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या चार दिवसीय संत समागमाचा शुभारंभ परम श्रद्धेय सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन छत्रछायेखाली श्रद्धा व आध्यात्मिक उत्साहाच्या वातावरणात झाला. या प्रसंगी देश-विदेशातून लाखो श्रद्धावान भक्त सहभागी झाले असून सद्गुरूंचे दिव्य दर्शन आणि पावन संदेशांचा लाभ घेत आहेत.

संत समागमाच्या प्रथम दिवशी मानवतेला संदेश देताना सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी सांगितले की, देश-विदेशातून संत-महात्मा एकत्र येण्यामागील मूलभूत उद्देश मानवाच्या मनामध्ये आध्यात्मिक जागृती कायम ठेवणे हा आहे, जेणेकरून जीवनातील प्रत्येक क्षण पूर्ण जाणीव आणि परमात्म्याच्या अनुभूतीसह जगता येईल.

सद्गुरू माता जी यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या घर, कुटुंब, समाज आणि देशाप्रती असलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडत एक जागरूक जागतिक नागरिक बनले पाहिजे. जात-पात, भाषा, प्रदेश किंवा स्वभावातील भेदांपलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला प्रेम, सन्मान आणि आपलेपणाच्या भावनेने स्वीकारणे हीच खरी मानवता आहे.

सद्गुरू माताजी यांनी पुढे सांगितले की, वास्तविक आध्यात्मिक जागृती केवळ विचारांपुरती किंवा दिखाव्यापुरती मर्यादित नसते, तर ती आपल्या वर्तनातून, आचरणातून आणि सामाजिक कर्तव्यांमधूनही प्रकट झाली पाहिजे. ही जागृती एखाद्या क्षणाची किंवा प्रसंगाची बाब नसून, ती आयुष्यभर टिकवून ठेवण्याची भावना आहे. परिस्थिती कोणतीही असो, परमात्म्याची रजा स्वीकारून प्रत्येक क्षण त्याचा प्रसाद मानत आनंद, समाधान आणि कृतज्ञतेने जगणे हीच खरी आध्यात्मिकता आहे.

समागमस्थळी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांचे स्वागत संत निरंकारी मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री. सुखदेव सिंह जी यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून, तर मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती राजकुमारी जी यांनी पुष्पहार अर्पण करून केले. तसेच निरंकारी राजपिता रमित जी यांचे स्वागत श्री. एस. एल. गर्ग यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून, तर श्री. एच. एस. चावला यांनी पुष्पहार अर्पण करून केले.

तद्नंतर सद्गुरू माता जी आणि निरंकारी राजपिता जी यांना फुलांनी सजविलेल्या खुल्या पालखीत विराजमान करून भव्य शोभायात्रेच्या रूपाने समागमाच्या पंडालमधून मुख्य मंचापर्यंत नेण्यात आले. या प्रसंगी निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्ट्सच्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम तसेच मधुर स्वागतगीत सादर करून दिव्य युगलाचे भावपूर्ण स्वागत केले.

सद्गुरू माता जी आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पावन सान्निध्याचा लाभ मिळाल्याने श्रद्धावान भक्त भावविभोर झाले. दिव्य युगलाने आपल्या स्नेहपूर्ण आशीर्वादाने सर्वांना निहाल केले. संपूर्ण वातावरण प्रेमभक्ती आणि आध्यात्मिक आनंदाने भारावून गेले.

विविध संस्कृती, जाती, धर्म आणि भाषांशी संबंधित श्रद्धावान भक्त सर्व भेदभावांपासून वर उठून प्रेम आणि मानव-एकतेच्या सूत्रात बांधलेले दिसून आले. हे मनोहारी दृश्य सद्गुरूंच्या प्रेम, सद्भाव आणि विश्वबंधुत्वाच्या संदेशाचे साक्षात रूप साकारत होते.

‘मानवतेच्या नावाने संदेश’ या कार्यक्रमाच्या शुभारंभापूर्वी संत समागमाच्या प्रथम दिवशी विशेष प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. यामध्ये देशभरातून आलेल्या मीडिया प्रतिनिधी आणि पत्रकारांनी सहभाग घेतला. त्यांनी निरंकारी संत समागमाचे आयोजन, त्यामागील आध्यात्मिक विचारधारा, उद्दिष्टे तसेच जनकल्याणकारी संदेश याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

निःसंशयपणे, ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा हा प्रथम दिवस आध्यात्मिक जागृती, मानवता, सेवा आणि विश्वबंधुत्वाच्या भावनेला समर्पित राहिला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi