प्रतिनिधी
फ्रान्सच्या मंत्री क्रायसोला झाकारोपाउलो सध्या भारत दौऱ्यावर असून, अणु उर्जेमधील भारत-फ्रान्स सहकार्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू-विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, डीओपीटी, प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची नवी दिल्लीमध्ये नॉर्थ ब्लॉक येथे भेट घेतली. त्यांच्या बरोबर फ्रान्सचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ होते.
महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर येथे अणुभट्ट्या उभारण्याच्या कामाला संयुक्त सहकार्याच्या माध्यमातून गती देण्याच्या मार्गांवर दोन्ही पक्षांनी यावेळी चर्चा केली. फ्रान्सचे भारतामधील राजदूत इमान्युएल लेनिन आणि अणुऊर्जा सल्लागार थॉमस मियुसेट यांच्यासह फ्रान्सचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्याने प्रत्येकी 1650 मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या उभारायला भारताने तत्वतः मान्यता दिली असून, भारताने फ्रान्स बरोबर सप्टेंबर 2008 मध्ये केलेल्या व्यापक अणु करारा अंतर्गत, उभारला जाणारा एकूण 9900 मेगावॅट क्षमतेचा हा सर्वात मोठा अणु-ऊर्जा निर्मिती प्रकल्प ठरेल.
ईडीएफ या फ्रेंच कंपनीने, जैतापूर येथे सहा युरोपियन प्रेशराइज्ड रिअॅक्टर्स (ईपीआर) बांधण्यासाठी बंधनकारक असलेली तांत्रिक-व्यावसायिक निविदा, गेल्या वर्षी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीआयसीएल) कडे जमा केली होती. यंदाच्या मे महिन्यात, ईडीएफ च्या उच्च स्तरीय पथकाने भारताला भेट दिली होती आणि एनपीआयसीएल बरोबर सविस्तर चर्चा केली होती. क्रायसोला झाकारोपाउलो यांनी जाहीर केल्या प्रमाणे, 2023 वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर येणार असून, त्या पूर्वी, तांत्रिक, आर्थिक आणि नागरी आण्विक दायित्वाबाबतचे प्रश्न दोन्ही बाजूंनी लवकरात लवकर सोडवले जातील, असे आश्वासन डॉ. जितेंद्र सिंह यांनी फ्रान्सच्या मंत्र्यांना दिले. डिसेंबरच्या मध्याला फ्रान्सचे अर्थ मंत्री ब्रुनो ल मेअर देखील भारत दौऱ्यावर येणार आहेत.
दोन्ही देशां दरम्यानच्या स्नेहमय आणि सर्वसमावेशक द्विपक्षीय संबंधांचा संदर्भ देत डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या मे महिन्यात आपल्या 3 दिवसांच्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पॅरिसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि जागतिक प्रश्नांसह विविध विषयांवर संवाद साधला होता, आणि मोदी यांनी, “भारत आणि फ्रान्स हे विकासाचे अभिमानास्पद भागीदार आहेत आणि ही भागीदारी विविध क्षेत्रांमध्ये प्रसारित होत आहे” अशी टिप्पणी केली होती.आजच्या बैठकीत, दोन्ही बाजूंनी विश्वासार्ह, परवडणारी आणि कमी-कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य होण्यासाठी जैतापूर ईपीआर या धोरणात्मक प्रकल्पाच्या यशस्वितेच्या वचनबद्धतेची ग्वाही दिली आणि प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवण्यावर सहमती दर्शवली.
या प्रकल्पाचा भविष्यातील ऑपरेटर (चालक) म्हणून एनपीसीआयएल, या प्रकल्पाचे बांधकाम आणि तो कार्यान्वित करण्यासाठी तसेच भारतातील सर्व आवश्यक परवानग्या आणि संमती मिळवण्यासाठी जबाबदार असेल. यामध्ये भारतीय नियामकाद्वारे ईपीआर तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण समाविष्ट आहे.डॉ. जितेंद्र सिंह यांनी आठवण करून दिली की, अणु ऊर्जा स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही आहे, तसेच अणु ऊर्जेमध्ये देशाची दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा शाश्वत आधारावर सुनिश्चित करण्याची प्रचंड क्षमता आहे. अणुऊर्जा प्रकल्पांनी आतापर्यंत सुमारे 755 अब्ज युनिट वीजनिर्मिती केली असून सुमारे 650 दशलक्ष टन CO2 उत्सर्जनाची बचत केली आहे. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, अणुऊर्जेसह विविध स्वच्छ उर्जा स्रोतांच्या संयोजनातून निव्वळ शून्य लक्ष्य पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने, बांधकामाधीन प्रकल्पांची पूर्तता झाल्यावर आणि संबंधित परवानग्या मिळाल्यावर सध्याची 6780 मेगावॅटची अणुऊर्जा क्षमता 2031 पर्यंत 22480 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे.