बारामती येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट*

Uncategorized

 

*युवकांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपत्तीकाळात योगदान द्यावे- जिल्हाधिकारी*

बारामती दि. ५ : आपत्तीच्या काळात प्रशिक्षित युवकांची आवश्यकता असते. त्यामुळे युवकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम प्रशिक्षण घेवून आपत्तीच्या काळात मोलाचे योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालय मुंबई आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, तहसिलदार विजय पाटील, परिविक्षाधीन-तहसिलदार नेहा शिंदे आदी उपस्थित होते.

बारामती आणि इंदापूर तालुक्यातील युवक या प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याबाबत समाधान व्यक्त करून डॉ.देशमुख म्हणाले, पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. अशावेळी मदत कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. या प्रशिक्षणामुळे आपत्तीच्या प्रसंगी आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे, विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी युवक-युवती तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणात महिलांचा अधिक संख्येने सहभाग कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

प्रशिक्षणामध्ये बारामती आणि इंदापुर तालुक्यातील युवकांसह आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल व स्वयंसेवक यांचा समावेश आहे. १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
०००