मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 चे आयोजन

सामाजिक

प्रतिनिधी

नऊ दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते होणार.

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 आयोजित केला आहे. हा महोत्सव भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची संधी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाते.हा महोत्सव 2019 मध्ये मध्य प्रदेशात, 2022 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि आता महाराष्ट्रात याचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील चर्चगेट येथील आझाद मैदान येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. भारत सरकारचे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील.

या 9 दिवसांच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारतातील सुमारे 350 लोककलाकार आणि आदिवासी कलाकारांसह सुमारे 300 स्थानिक लोककलाकार, काही ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग कलाकार, प्रसिद्ध शास्त्रीय कलाकार तसेच प्रसिद्ध स्टार कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

लोककलाकारांच्या रोज सादर होणाऱ्या नृत्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रशांत गोगोई यांनी केले आहे.शास्त्रीय सादरीकरणामध्ये रिदम्स ऑफ मणीपूर ,तेजस्विनी साठे, नागालँडचे लिपोकमार झुदीर, कलाक्षेत्रातील शीजिथ कृष्णा, गणेश चंदनशिवे, आनंद भाटे, नृत्यगुरु शमा भाटे आणि मैत्रेयी पहारी हे कलाविष्कार सादर करणार आहेत. मोहित चौहान, शमित त्यागी, सिद्धार्थ एंटरटेनर्स – राज आणि किशोर सोढा, अन्नू कपूर, डॉ. सलील कुलकर्णी, अविनाश चंद्रचूड, उस्ताद मामे खान, राहुल देशपांडे आणि नितीन मुकेश हे प्रख्यात कलाकार महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.

दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

सकाळी 11:00 ते रात्री 10:00 हस्तकला आणि कला प्रदर्शन.

दुपारी 02:30 ते 03:30 स्थानिक कलाकारांचे मार्शल आर्टचे सादरीकरण

दुपारी 04:00 ते 05:30 स्थानिक कलाकारांचे सादरीकरण

संध्याकाळी 06:00 ते 06:45 पारंपरिक, आदिवासी आणि लोकनृत्य नृत्य सादरीकरणासह

संध्याकाळी 07:00 ते रात्री 08:15 प्रसिद्ध शास्त्रीय कलाकारांचे कार्यक्रम.

रात्री 08:30 ते रात्री 10:00 प्रसिद्ध तारेतारकांचे कार्यक्रम.

या व्यतिरिक्त, भारतातील सर्व राज्यांमधून आणि सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांमधून सुमारे 150 कारागीरांना ‘आंगन’ अंतर्गत कला आणि हस्तकला विक्री-तसेच-प्रदर्शनासाठी आमंत्रित केले आहे. त्यासाठी सुमारे 70 स्टॉल उपलब्ध केले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य हातमाग विभाग आणि स्टार्टअप्ससाठी 25 स्टॉल्स उभारण्यात येत आहेत.

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांचे चित्र प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या आयजीएनसीएने ‘पंढरपूर वारी’वर प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

केन्द्रीय संचार ब्युरो, या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवर प्रदर्शनही आयोजित करत आहे.

इथे खाद्य विभागही उभारला जात असून भारतभरातील खाद्यपदार्थांचे प्रकार, स्थानिक खाद्यपदार्थ तसेच भरडधान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ उपलब्ध करणारे सुमारे 37 स्टॉल सर्वसामान्यांसाठी सज्ज असतील.

केन्द्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रे आणि अकादमी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे.

संपूर्ण कार्यक्रम सर्व नागरिक आणि कलाप्रेमींसाठी विनामूल्य आहे.