जागरुक पालक व सुदृढ बालक अभियानाचे डोर्लेवाडी येथे आयोजन

Uncategorized

प्रतिनिधी

बारामती दि. ९ : पुणे जिल्हा परिषद, बारामती पंचायत समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय ‘जागरुक पालक व सुदृढ बालक’ अभियानाचे डोर्लेवाडी येथे आयोजन करण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या हस्ते झाला.

कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू दडस, डॉ. वैशाली देवकाते, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. प्रतिभाताई नेवसे, पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल झारगड, डोर्लेवाडीचे सरपंच पांडुरंग सलवदे, ग्रामपंचात सदस्य दत्तात्रय काळोखे, समुदाय आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच तालुक्यातील विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. खोमणे म्हणाले, तालुक्यातील शुन्य ते अठरा वयोगटातील शहरासह एकुण १ लाख २० हजार बालकांची ५८ पथकाद्वारे येत्या एक महिन्यात संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत ज्या बालकांना पुढील उपचाराची गरज लागणार आहे, अशांना शासनातर्फे दुसऱ्या टप्प्यात मोफत मदत करून त्यांच्या आरोग्य समस्येचे निवारण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अस्थिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, दंतरोग व बालरोग आदींची तपासणी करून योग्य तो उपचार करण्यात आला. या शिबीरात एकुण बाह्यरुग्ण नोंदणी ६७४ झाली तसेच काही रुग्णांना पुढील उपचाराकरीता संदर्भसेवा देण्यात आली.