बँकांना संशयास्पद व्यवहाराची माहिती देण्याच्या सूचना

Uncategorized

पुणे दि. १२: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड जमा करणे किंवा काढण्याच्या व्यवहारांची तसेच संशयास्पद वाटणाऱ्या १ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारांची माहिती दररोज पाठविण्याबाबत मतदार संघातील सर्व बँकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीसंबंधी कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारांची बाब निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सर्व पथक प्रमुखांना दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची माहिती मतदार संघातील सर्व बँकांना पाठविण्यात आली आहे. संशयास्पद वाटणाऱ्या व्यवहारांची माहिती विहित नमुन्यात निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे. त्यामुळे सर्व बँकांकडून अशा व्यवहारांची दैनंदिन माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास mcc205chinchwad@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठविण्याबाबतचे पत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांनी सर्व बँकांना पाठविले आहे.
000