डेक्कन व चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक, पार्कींग व्यवस्थेत बदल

Uncategorized

पुणे, दि.१३ : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने डेक्कन वाहतुक विभागाअंतर्गत चैत्राली को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड ते क्षितीज बंगला पर्यत (जकातदार पथ) दोन्ही बाजूस अंदाजे २५० ते ३०० मीटर नो-पार्किंग करण्याचे तसेच चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत पाषाण- सूस पुलावर सुरक्षित वाहतुक सुरु रहावी तसेच अपघात टाळण्याच्यादृष्टीने वाहतुकीत बदल करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

चतु:श्रुंगी वाहतूक विभागांतर्गत पाषाण कडून सूस कडे जाणाऱ्या रस्त्यावर सूस पुलाच्या अलिकडे उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. त्याऐवजी नागरिकांनी पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या सोसायटीतील नागरिकांनी सूस पूल पार करुन २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून ननावरे भुयारी मार्गाने इच्छित स्थळी जावे. पाषाण मार्ग साताराकडे पुणे-बेंगलोर महामार्गालगत जाण्यासाठी वाहन चालकांनी साई चौक पाषाण येथून डावीकडे वळून सुतारवाड पाषाण मार्गे इच्छित स्थळी जावे. हिंजवडी, सूस तसेच मुंबईकडे जाण्यासाठी सूस पूल पार करुन २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून सेवा मार्गाने मुंबईकडे तसेच सुसकडे इच्छितस्थळी जावे.

याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २५ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.