प्रतिनिधी.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत इंडो डच तंत्रज्ञानावर आधारीत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे अंतर्गत बारामती कृषि विज्ञान केंद्र येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्रात गेल्या पाच वर्षापासून उच्च तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित शेतीमध्ये भाजीपाला लागवड पद्धती व उत्पादन करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
भाजीपाला उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये चीननंतर दुसरा क्रमांक आहे. दिवसेंदिवस आपल्या देशातील भाजीपाल्याचे उत्पादन मागणीनुसार वाढत आहे. वातावरणातील बदलानुसार बहुतांश शेतकरी संरक्षित शेती म्हणून पॉलीहाउस शेतीकडे वळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पॉलीहाउसमध्ये रंगीत ठोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, चेरी टोमॅटो व परदेशी भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येत आहे. भाजीपाला पिके उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजीपाला गुणवत्ता केंद्र शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त आहे.
*दीड कोटीपेक्षा अधिक रोपांचा पुरवठा*
भाजीपाला गुणवत्ता केंद्राची स्थापना नोव्हेंबर २०१७ मध्ये करण्यात आली. या केंद्रातर्फे आतापर्यंत शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख ३३ हजार रोपांचा पुरवठा करण्यात आला आहे. आठ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान व इतर संबंधित बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्रात आधुनिक पद्धतीने भाजीपाला उत्पादनाची २१ प्रात्यक्षिके आणि शेतकऱ्याच्या शेतात ९२ भाजीपाला उत्पादनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. याचा लाभही शेतकऱ्यांना झाला आहे.
*भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील सुविधा*
हरितगृहातील अत्याधुनिक डच तंत्रज्ञान वापरून उत्तम दर्जाची रोग व कीड मुक्त भाजीपाला रोपे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरवली जातात. रोपांच्या विक्रीपश्चातत शेतकऱ्यांना लागवडीबाबत मार्गदर्शन केले जाते. हरितगृहमधील वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची उच्च तंत्रज्ञानाची प्रत्यक्षिके दाखवली जातात. आधुनिक व स्वयंचलित यंत्रणेच्या सहायाने पाण्याच व खतांचा योग्य प्रमाणात वापर कशाप्रकारे करतात याची माहिती त्यांना दिली जाते.
केंद्रात शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी , कृषी अधिकारी , विद्यार्थी खाजगी संस्था व उद्योजक यांच्यासाठी प्रशिक्षण सुविध आहे. विषमुक्त भाजीपाला उत्पादन व यांचे विक्री व्यवस्थापन याबाबतदेखील येथे मार्गदर्शन केले जाते. कृषि विज्ञान केंद्र निर्मित विविध दर्जेदार जैविक कीटकनाशके , जैविक बुरशीनाशके तसेच विविध मायक्रोन्यूट्रीयंट रास्त दरामध्ये शेतकऱ्यांसाठी येथे उपलब्ध आहेत.
केंद्रात माती ,पाणी तसेच पान व देठ परीक्षण प्रयोगशाळेची उपलब्धता आहे. सेंद्रिय तसेच विषमुक्त उत्पादीत मालाला भारतीय तसेच परदेशी बाजारपेठ मिळवून देण्यास शेतकऱ्यांना येथे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. करार शेतीच्या माध्यमातून भाजीपाला मूल्यवर्धित साखळी तयार करण्यास मदत होत असल्याने उत्पादित मालाला योग्य हमीभाव मिळतो.
भाजीपाला गुणवत्ता केंद्राअंतर्गत पॉलीहाउस मधील रंगीत ढोबळी मिरची, टोमॅटो व काकडी यांचे तांत्रिकदृष्ट्या उत्पादन घेण्यासाठी शेतकरी माहिती मिळवून चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळवत आहेत. इतर भाजीपाल्यांबाबतही चांगले मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला गुणवत्ता केंद्राचा लाभ होत आहे.
-श्री.यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या-भाजीपाला गुणवत्ता केंद्र कृषी विज्ञान केंद्र बारामती
(संकलन-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे)