प्रतिनिधी.
बारामती, दि. २७ : बारामती उप विभागात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गतच्या कामांसाठी निवडण्यात आलेल्या गावातील कामांच्या प्राथमिक आराखड्यांना येत्या १ मेच्या ग्रामसभेत मान्यता घेऊन आराखडे अंतिम करण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिले.
बारामती उप विभागातील ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गतची आढावा बैठक प्रशासकीय भवनातील सभागृहात प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, उप विभागीय जलसंधारण अधिकारी जयेश हेडगिरे, बारामतीच्या तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, इंदापूरचे कृषि अधिकारी भाऊसाहेब रुपनवार, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, ग्राम सेवक, तलाठी आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, या अभियानात बारामती तालुक्यातील ३९ गावे आणि इंदापूर तालुक्यातील ११ गावे निवडण्यात आली आहेत. या गावातील जलयुक्त शिवारच्या कामांचा प्राथमिक आराखडा तयार करुन त्याला १ मे रोजीच्या ग्रामसभेत मान्यता घ्यावी. ग्राम समितीबरोबर शिवार फेरी करुन त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्यात यावा. आराखडा तयार करताना गावातील नागरिकांच्या सूचना विचारात घेण्यात याव्यात. प्राथमिक आराखड्यात निवडलेल्या कामांचे सर्वेक्षण करुन तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेनुसार कामे अंतिम करुन अंतिम आराखडा तयार करावा. आराखड्यामध्ये पिण्याचे पाणी, शेतीसाठी लागणारे पाणी, जनावरे यांना लागणारे पाणी या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा.
या अभियानात शेततळे, नालाउपचार, दुरुस्ती, गळमुक्त धरण, नूतनीकरण, पूर्वीची अपूर्ण कामे आदी कामांचा समावेश करू शकतो. दुरुस्तीच्या प्रकल्पाचे अंदाजपत्रक एकच करणे आवश्यक आहे. एकदा पूर्ण झालेले काम पुढील ५ वर्षात दुरुस्तीसाठी अनुज्ञेय होणार नाही. हे अभियान उप विभागात मोहीम स्तरावर राबवायचे आहे. जलयुक्त शिवारच्या कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता असली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय जल संधारण अधिकारी जयेश हेडगीरे यांनी बारामती आणि इंदापूर तालुक्यात या अभियानांतर्गत करावयाच्या कामांची माहिती दिली. तहसिलदार गणेश शिंदे आणि श्रीकांत पाटील यांनी जल युक्त शिवाराची कामे कशा प्रकारे करावीत याबाबतच्या सूचना दिल्या.
*बारामती उप विभागात जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेली गावे :*
*बारामती तालुका (३९ गावे):* गुनवडी, मळद, कन्हेरी, डोर्लेवाडी, पिंपळी, ढेकळेवाडी, झारगडवाडी, कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, काटेवाडी, माळेगांव खु., खांडज, निरावागज, मुर्टी, मासाळवाडी, मुढाळे, वढाणे, कुतवळवाडी, आंबी खु., भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, देऊळगांवरसाळ, नारोळी, कोळोली, दंडवाडी, सुपे, लोणीभापकर, काऱ्हाटी, माळवाडी, आंबी बु., पळशी, मोरगाव, तरडोली, अंजनगाव, सोनवडी सुपे
*इंदापूर तालुका (११ गावे):* पिटकेश्वर, निमगांव केतकी, गोतंडी, कळस, शिंदेवाडी, काझड, बोरी, शेळगांव, भरणेवाडी, कडबनवाडी, अंथुर्णे