प्रतिनिधी
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होण्यासाठी बारामती उपविभागात १ ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताहाला सुरुवात करण्यात येत आहे.
महसूल दिन १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद आणि ७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता होणार आहे.
यामध्ये १ ऑगस्ट रेाजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून यावेळी गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार, शेतीविषयक व महसूल कायद्याविषयक सेवा निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या चित्ररूप, जमीन व्यवहार निती या गोष्टरूपी फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. कलम १५५च्या प्रत्येक सजामधून किमान ५ प्रकरणांचा ऑनलाईन निपटारा करण्यात येणार आहे. प्रत्येक गावाला स्मशानभूमी / दफनभूमी सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
‘युवा संवाद’ अंतर्गत २ ऑगस्ट रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, माळेगांव अभियांत्रिकी महाविद्यालय, माळेगांव बु., नव महाराष्ट्र विद्यालय पणदरे, स्वातंत्र्य विद्यामंदीर वडगाव निं, मयुरेश्वर विद्यालय मोरगाव, न्यू इंग्लिश स्कूल लोणीभापकर, शहाजी विद्यालय सुपे, आणि शिरसाई विद्यालय, शिर्सुफळ येथे येथे शैक्षणिक कामाकरीता लागणाऱ्या विविध दाखले काढण्याबाबत, राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी मतदार नोंदणीबाबत जनजागृती तसेच ई-पीक पाहणीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘एक हात मदतीचा’ अंतर्गत ३ ऑगस्ट नैसर्गिक आपत्तीबाबत शासनाकडून मिळणारे लाभ, पीक विमासंबंधित माहिती तसेच फळबाग, शेती, जनावरे यांचे नुकसानीबाबतची माहिती व लाभ देणे तसेच तलाठी स्तरावर पीकपेरा, सातबारा, आठ अ व मंडलस्तरावर इतर दाखले देण्यात येणार आहेत.
‘जनसंवाद’ अंतर्गत ४ ऑगस्ट रोजी मंडल स्तरावर महसूल अदालतीचे आयोजन तसेच जमिनीविषयक आवश्यक असणऱ्या नोंदी अद्यावत करणे, उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रलंबित प्रकरणे व अपिले निकाली काढणे, तहसिलस्तरावर रस्त्याबाबत प्रलंबित अर्ज निकाली काढणे, प्राप्त अर्जावर कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
‘सैनिक हो तुमच्यासाठी’ अंतर्गत ५ ऑगस्ट रोजी सशस्त्र दलात कार्यरत असणाऱ्यां सैनिकांच्या कुटुंबियांना आवश्यक असणाऱ्या व महसूल विभागातून निर्गमित होणारे दाखल्यांचे वाटप करणे, संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित अर्जावर कार्यवाही करणे, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढणे आणि तहसिलदार स्तरावर माजी सैनिकांचे मेळावे आयोजित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
‘महसूल संवर्गातील कार्यरत,सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद’ अंतर्गत ६ ऑगस्ट रोजी संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध सेवाविषयक प्रलंबित बाबी निकाली काढणे, आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नती बाबत सभा आयोजित करणे, दुबार सेवापुस्तके तयार करण्यात येणार आहेत.
‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ अंतर्गत ७ ऑगस्ट रोजी तालुक्यातील मोजे डोर्लेवाडी येथील नंदीवाले व इतर समाजातील लोकांना जातीचे दाखल्यांचे वाटप करणे, तालुक्यातील पोट खराब असलेल्या क्षेत्राचे लागवडीलायक झालेले क्षेत्राचे सातबारा व फेरफार वाटप करणे, राष्ट्रीय सामाजिक योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे लाभ मंजूर पत्राचे वाटप करणे आणि दुबार शिधापत्रिका वाटप करण्यात येणार आहेत.
महसूल सप्ताहाअंतर्गत उपविभागीय, तहसील, मंडळ आणि गावपातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन ७ ऑगस्टपर्यंत सुरु असणाऱ्या महसूल सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.