मराठवाड्याच्या हिंगोलीतून आलेल्या एका तरुणाची बारामतीत गरुड झेप.

Uncategorized

विशेष प्रतिनिधी शिवाजीराव काकडे

-मराठवाड्याच्या हिंगोलीचा एक तरुण मुलगा. पुण्याच्या सीओईपीमधून इंजिनिअर होतो काय आणि बारामती एमआयडीसीत नोकरीच्या निमित्ताने येतो काय. सहज हौस म्हणून तो आपल्याच बिल्डींगमधील पहिल्यांदा दोन मुलांना आणि नंतर काही मुलांना शिकवायला लागतो काय. आणी अवघ्या काही वर्षात हाच तरुण पोरगा आपली नोकरी सोडून बारामतीमध्ये अव्वल दर्जाची शैक्षणिक संस्था उभी करतो, ज्या संस्थेत सगळ्या राज्यातून विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. एखादे स्वप्न वाटावे असे हे सगळे बारामतीत खरोखरच घडले आहे.

या तरुण मुलाचे नाव प्रा. ज्ञानेश्वर मुटकूळे आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्य मदतीने उभ्या केलेल्या संस्थेचे नाव १७२९ आचार्य अॅकॅडमी. खरे पाहिले तर ज्ञानेश्वर सरांचे हे यश जेवढे त्यांचे आहे, तेवढेच बारामतीचेही आहे. बाहेरगावचा कुणी येथे येऊन मोठा झाला म्हणून येथे कुणी कुणाचा दुस्वास करत नाही, तर त्याच्या कर्तृत्वाला आणखी आभाळ मोकळे करून दिले जाते. बारामतीच्या याच संस्कृतीचे एक फलित म्हणजे आचार्य अॅकॅडमी.

शिक्षणाचे क्षेत्र बदलते आहे, नवेनवे तंत्रज्ञान येते आहे, त्यासोबत शिकविण्याच्या पद्धतीही सतत बदलत आहे. या बदलाला सामोरे जात अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरून विद्यार्थी घडविण्याचा आचार्य अॅकॅडमीचा ध्यास आहे. पैसा मिळविण्याचा ध्यास घेण्यापेक्षा चांगली कर्तृत्ववान माणसे मिळविण्याचा ध्यास घेतला तर त्यांच्यामागे पैसा आपोआप येतो हे सरांचे जीवनसुत्र आहे. त्यातून त्यांनी अशा कर्तृत्ववान माणसांची टीम बांधण्यावर जास्त भर दिला. यासाठी त्यांना प्रा. सुमीत सिनगारे, कमलाकर टेकवडे आणि प्रा. प्रवीण ढवळे या संचालकांनी साथ मिळाली. आज सीओईपी, आयआयटी, एनआयटी सारख्या नामवंत संस्थात शिकलेले आणि शिकविण्यात महारत मिळविलेल्या शिक्षकांचा मोठा संच आचार्यकडे आहे. हाच त्यांचा सर्वात मोठा ठेवा आहे.

नीट, जेईई, सीईटी, एनडीए या स्पर्धापरिक्षेतील यशाने विद्यार्थ्यांसाठी अनेक नामवंत शिक्षणसंस्थांची दारे उघडतात. अशा संस्थांमधून बाहेर पडल्यावर करियरच्या अनेक संधी त्याच्यापुढे हात जोडून उभ्या राहतात. अशा या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्य़ा स्पर्धापरीक्षांची तयारी करून घेणे हे आचार्यचे प्रमुख काम आहे. सुरु होऊन अवघी काही वर्षे झाली असतानाही यामध्ये उत्तम असे यश मिळालेले आहे. येथे येणारा विद्यार्थी हा मुख्यत: निमशहरी तसेच ग्रामीण भागातून येतो. पुष्कळदा त्याच्या घरात शिक्षणाची परंपरा नसते. अशा मुलांना घडविण्याचे काम येथे होते.
अध्यापन पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा येथे चांगला परिणाम दिसून आला आहे. यातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे तातडीने निराकरण होते आणि त्याची जिज्ञासूवृत्ती वाढीला लागते. शिक्षण देण्याच्या या पद्धतीचाच परिणाम म्हणून ऑलिंपियाड, टॅलेंट सर्च, जेईई, नीट, एनडीए, सीईटी सारख्या परीक्षांमध्ये आचार्यच्या विद्यार्थ्यानी उत्तम यश मिळविले आहे.

मात्र विद्यार्थी पैसा आणि संपत्तीच्या मागे लागलेले यंत्र न बनता सुसंस्कारी माणुस बनावा हे ज्ञानेश्वर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कायमचा मुख्य विचार राहिला आहे. त्यांच्या या दृष्टीकोनामुळेच १७२९ आचार्य अॅकॅडमी भविष्यात मोठी झेप घेईल याच शंका नाही