सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद

क्राईम

प्रतिनिधी

सातार्‍यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे रविवारी रात्री उशीरा दोन गटात उसळलेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली असून एका समाजाच्या प्रार्थनास्थळाचीही तोडफोड केली आहे. या घटनेमुळे सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. पुसेसावळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

साताऱ्यातील दंगलीनंतर महाराष्ट्रात अलर्ट : कुसेसावळी येथे रात्री उसळलेल्या दंगलीत एका प्राथनास्थळाला लक्ष्य करण्यात आले. त्याची तोडफोड करण्यात आली. काही दुकाने तसेच घरांना आग लावण्यात आली. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक तरुण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर जखमींवर कराड, सातारा, वडूज, औंध आणि कडेगाव येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे कुसेसावळी दंगलीची दाहकता सर्वसामान्यांना कळली. या घटनेनंतर राज्यभरातील पोलिसांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

केअर टेकरचा झाला मृत्यू: सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरून गेल्या दोन-चार दिवसांपासून पुसेसावळी गावातील वातावरण धुमसत होते. या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली होती. परंतु, रविवारी रात्री वाद उफाळून आल्याने दंगल उसळली. दंगलीत जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली. तुफान हाणामारी झाली. त्यात एका प्रार्थनास्थळाच्या केअर टेकरचा मृत्यू झाला आहे. नूर हसन शिकलगार (वय 30), असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला आहे. या दंगलीत आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर उपचार सुरू आहेत.