प्रतिनिधी
रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. हा पराभव काही क्रिकेट रसिकांनी पचवला तर काहींना मोठे दुख: झाले. यातुन मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केली तर अमरावती जिल्ह्यात मात्र, हा पराभाव सहन न झाल्याने याचा दोष लहान भावाला देत मोठ्या भावाने त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत एकाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यात लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात घटना घडली.
अंकित इंगोले (वय २८) असे हत्या करण्यात आलेल्या लहान भावाचे नाव आहे. तर रमेश इंगोले असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर प्रवीण इंगोले (वय ३२) असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तिघे जण घरी असतांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहत होते. यावेळी तिघे मद्यपान करत होते. दरम्यान, वडील आणि लहान भावाने मटन खाल्ले. सामना सुरू असतांना ऑस्ट्रेलियाचे पारडे जड झाले आणि त्यांनी भारताला नमवत विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला आणि वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारताच्या संघाचा झालेला हा पराभव प्रवीणला रुचला नाही. त्याने दारूच्या नशेत याला त्याचे वडील आणि भाऊ जबाबदार असल्याचे धरले. तुम्ही मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत प्रवीणने दोघांशी वाद घालण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत वाद सुरू असतांना प्रवीणचे वडील रमेश यांनी प्रवीणच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत त्याला फेकून मारला.
याचा राग आल्याने प्रवीणने जवळील लोखंडी रॉडने वडील रमेश आणि त्याचा भाऊ अंकित याच्यावर हल्ला केला. यात अंकित हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर वडील रमेश हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या आवाजाने अजूबाजूने नागरीक घटनास्थळी आले, त्यांनी प्रवीणला पकडून ठेवले तसेची अंकित आणि वडील रमेश यांना दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी अंकितचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. वडील रमेश यांच्यावर दवाखान्यात उपचार असून त्यांची प्रकृती ही गंभीर आहे. वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपी प्रवीणवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.