चालकाला रुग्णवाहिकेतून खाली खेचलं, बांबूने मारलं, मग चाकूने… डी. वाय. पाटील रुग्णालयासमोरील धक्कादायक घटना

क्राईम

प्रतिनिधी

नेरुळ येथे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाला चौघांनी गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता त्याला बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. रुग्णवाहिका चालक हा डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या परिसरात रुग्णवाहिका पार्क करत असताना ही घटना घडली आहे. रुग्णवाहिका चालक पूर्ण घायाळ होताच चालकाच्या मानेत खुपसलेला चाकू तशाच अवस्थेत टाकून आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

चार इसमांनी रुग्णवाहिका चालकाची हत्या का केली असावी, हा प्रश्न अनेकांना पडलेला असावा. मात्र, क्षुल्लक कारणांवरून डोक्यात राग धरून ही हत्या करण्यात आली आहे. कारण, शेजारच्या नारळ विक्रेत्या स्त्रीसोबत या चार आरोपींचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या रागातून या चारही इसमांनी त्या नारळ विक्रेत्या स्त्रीचे नारळ चोरले होते. युवराज अमरेंद्र सिंह (वय३० वर्षे) यांनी नारळ चोरणाऱ्या व्यक्तीचे व्हडिओ मोबाईलमध्ये काढल्याचा राग मनात धरून ही हत्या केल्याचं समोर आलं असून ही घटना डी. वाय. पाटील परिसरातील गेट जवळ घडली.

युवराज अमरेंद्र सिंह हे रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मात्र, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल गेटजवळ या ड्रायव्हरची चार अज्ञात इसमांनी छातीत आणि पोटात चाकू भोसकून हत्या केली, असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर २ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. चारही आरोपींचे शेजारच्या नारळ विक्रेत्या स्त्रीसोबत भांडण झालेलं होतं. चारही आरोपींनी त्या नारळ विक्रेत्या स्त्रीचे नारळ चोरल्याचे शूटिंग या मयत इसमाने काढल्याचा राग मनात धरून आरोपींनी ही हत्या केलेली असल्याचे डीसीपी झोन वनचे विवेक पानसरे यांनी सांगितले.