मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाबद्दल काकडे महाविद्यालयाचा उच्च शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते गौरव.

Uncategorized

प्रतिनिधी
सोमेश्वरनगर: केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या विशेष उपक्रमामध्ये येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाने केलेल्या विशेष कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. महाविद्यालयाने दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात बारामती तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाच्या सेल्फी अपलोड करण्याबाबत नुकतेच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केले आहे. त्यात सुमारे १० लाखांहून अधिक सेल्फी अपलोड केल्याचे जागतिक रेकॉर्ड केले. त्यात काकडे महाविद्यालयाने विशेष कामगिरी करून सुमारे २२ हजार सेल्फी अपलोड केले होते. याबद्दल महाविद्यालयाचा गुणगौरव करण्यात आला. या प्रक्रियेत महाविद्यालयातील सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले होते. याबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सतीशराव काकडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. हा गौरव स्वीकारण्यासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अभिजीत काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. सतीश लकडे, डॉ. नारायण राजूरवार व प्रा. रजनीकांत गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार समितीचे सदस्य व ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य संयोजक श्री. राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, श्री. सागर वैद्य, बागेश्रीताई मंठाळकर, डॉ. डी. पी. पवार, अधिसभा सदस्य श्री. प्रसेनजित फडणवीस, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते.