मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

Uncategorized

प्रतिनिधी.

पुणे,  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम बारा पोटजाती या समाजातील विद्यार्थांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना पूर्वरत सुरु करण्यात आली असून योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत देशांतर्गत शिक्षणासाठी ३० लाख रुपये आणि परदेशातील शिक्षणासाठी ४० लाख रुपयांपर्यंत कर्जाची मर्यादा आहे. महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. देशात व परदेशातील शिक्षणासाठी तीन लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा आहे.

देशांतर्गत शिक्षणाकरीता महिलांसाठी ५.५ टक्के व पुरुषांसाठी ६ टक्के आणि परदेशातील शिक्षणाकरीता महिलासाठी ६.५ टक्के व पुरुषासाठी ७ टक्के व्याजदर आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी दहा लाखापर्यतच्या कर्जाकरीता १० वर्ष तसेच दहा लाखापेक्षा अधिक कर्जाकरीता १२ वर्षे आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ६ महिने अथवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईल तेंव्हापासून कर्ज परतफेडीची सुरुवात करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जासाठी असलेल्या अभ्यासक्रमांची यादी https://www.nsfdc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, तळमजला, ए.विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स.क्र.१०३/१०४, मेन्टल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर, येरवडा, ४११ ००६ येथे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.