प्रतिनिधी
गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात खूप मोठी दुर्घटना घडली आहे. बडोदा जिल्ह्यातील हरणी तलावात 25 विद्यार्थी त्यांच्या दोन शिक्षकांसह एका नावेतून फिरायला गेले होते. पण त्यांचं नाव पाण्यात डुबलं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापैकी एकाही विद्यार्थाने आणि शिक्षकाने नावेत बसताना लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं. त्यांना लाईफ जॅकेट न देताच नावेत बसवण्यात आलं होतं. तसेच संबंधित नावेची क्षमता ही केवळ 16 जणांची होती. पण त्यामध्ये तब्बल 27 जणांना बसवण्यात आलं होतं. त्यामुळे संपूर्ण नाव तलावात पलटी झाली. या अपघातात आतापर्यंत 11 विद्यार्थी आणि त्यांच्या 2 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या 13 जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाले आहेत. तर इतर विद्यार्थ्यांचा शोध सुरु आहे. अतिशय सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेमुळे तब्बल 13 कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने प्रशासन आणि अग्निशमन दलाची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली. अग्निशमन दलाच्या जवानांना काही विद्यार्थ्यांचा प्राण वाचवण्यात यश आलं आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने SSG रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी प्रशासनाच्या टीमसह डीसीपी, एसीपी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. बचावाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.
हरणी तलावात बुडालेले हे सर्व विद्यार्थी बडोद्याच्या न्यू सनराइज शाळेचे विद्यार्थी आहेत. या बोटीची क्षमता 16 जणांना घेऊन जाण्याची होती. पण बोटीतून 27 जणांना घेऊन जाण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांसह दोन शिक्षिकाही होत्या. छाया सुरती आणि फाल्गुनी पटेल असं या शिक्षिकांची नावे आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 11 विद्यार्थी आणि दोन शिक्षिकांचा मृत्यू झाला आहे.