गर्लफ्रेंडच्या आईचा गळा दाबून खून, पाषाण परिसरातील घटना
1 min read

गर्लफ्रेंडच्या आईचा गळा दाबून खून, पाषाण परिसरातील घटना

प्रतिनिधी

प्रेमाला विरोध केल्याने गर्लफ्रेंडच्या आईचा तरूणाने पट्टयाने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाषाण- सुस रस्त्यावरील एका सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी तरुणाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. वर्षा क्षीरसागर (वय ५८, रा. माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटी, पाषाण-सूस रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवांशू दयाराम गुप्ता (वय २३, रा. मोहनवाडी, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत तरूणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरूणी आणि शिवांशू यांचे गेल्या सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वादविवाद झाले होते. त्यामुळे तरुणीने शिवांशूसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. वर्षा क्षीरसागर यांनी त्याला मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवू नको, असे बजावले होते. त्यामुळे शिवांशू तरुणीच्या आईवर चिडला होता. तो रात्री बाराच्या सुमारास माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटीत गेला. त्याने वर्षा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांचा पट्टयाने गळा आवळून खून केला. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चौकशीनंतर वर्षाचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिवांशूला अटक केली. पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करीत आहेत.