जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते जिल्हास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजित ‘यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक जिल्हास्तरीय स्पर्धा २०२३-२४’ चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, शिक्षण उपसंचालक महेश पालकर, शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, संध्या गायकवाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन नवले, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, स्पर्धेत सहभागी शाळांचे शिक्षक आदी उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कौशल्य प्राप्त केल्यास समाजात मानाचे स्थान मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, विद्यार्थांसाठी खेळ हा आनंदाचा क्षण असतो. स्पर्धेत सहभागी विद्यार्थी, संघांनी यश प्राप्त करून संधीचे सोने करावे. अपयशाने खचून न जाता काय चुकले हे शिकून पुढील स्पर्धेसाठी तयार व्हावे. केंद्र, तालुका स्तरावरील स्पर्धेत यशस्वी होत पुढे आलेल्या विद्यार्थ्यांनी, संघानी या स्पर्धेत त्यांचे कौशल्य दाखवून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दोन दिवसीय चालणाऱ्या या स्पर्धेत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याचा संघानी, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

श्री. पालकर म्हणाले, विद्यार्थ्यांचा अभ्यासातील थकवा, ताण हा खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील मुले अत्यंत चपळ, काटक असतात. त्यांच्या जिद्दिने, कौशल्याने ते पुढे येत असतात. कौशल्य सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. राज्यस्तरावर चमकणाऱ्या संघाला, विद्यार्थ्यांना क्रीडा प्रबोधनीत विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिले जातात. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविकात श्रीमती गायकवाड यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. स्पर्धेत तालुकास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेते संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेत एकूण ३ हजार ७३४ विद्यार्थी सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. नवले यांनीही मनोगत व्यक्त केले.

या दोन दिवसीय स्पर्धेत कबड्डी, खो-खो, थाळी फेक, गोळा फेक, धावती उंच उडी, धावती लांब उडी, ५० व १०० मीटर धावणे या खेळांसह वकृत्व, प्रश्नमंजुषा, भजन, कव्वाली, लोकनृत्य, लेझीम आदी कला व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम होणार आहेत.