प्रतिनिधी
सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ईव्हीएम यंत्र चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. इव्हीएम यंत्र चोरणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. ग्रामीण पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आली आहेत. चोरट्यांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. खोलीतील लोखंडी मांडणीवर ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी त्यापैकी डेमो ईव्हीएम यंत्र चोरून नेले. या घटनेची सासवड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले. चित्रीकरणात तीन चोरटे आढळून आले आहेत. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.