शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्तीचा अभाव, सर्वेक्षणातील निष्कर्ष चिंताजनक

इतर

प्रतिनिधी

देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, उत्तम आरोग्याचा अभाव असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पाचपैकी दोन मुलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक (बीएमआय) निरोगी नाही, चारपैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून दिसून आला.

स्पोर्ट्झ व्हिलेज या संस्थेने केलेल्या १२ व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले. एज्युस्पोर्ट्स इन स्कूल फिजिकल एज्युकेशन कॅम्प या उपक्रमाद्वारे देशभरातील शाळांमधील मुलांचे शरीर वस्तुमान निर्देशांक (बीएमआय), एरोबिक क्षमता, लवचिकता, शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकद अशा विविध निकषांच्या आधारे शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यात आली. या सर्वेक्षणात देशातील २५० शहरे आणि गावांमधील विविध शाळांमधील ७ ते १७ वर्षे वयोगटातील ७३ हजारपेक्षा अधिक मुलांचा समावेश होता. शालेय मुलांची शारीरिक तंदुरुस्ती खूपच खालावल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले.

निरोगी बीएमआय पातळी असलेल्या मुलींची टक्केवारी मुलांच्या तुलनेत जास्त आहे. लवचिकता आणि शरीराच्या वरच्या भागातील ताकद या बाबतीत मुली मुलांच्या पुढे, तर एरोबिक क्षमता आणि शरीराच्या खालच्या भागाची ताकद याबाबतीत मुली मुलांपेक्षा मागे आहेत. दर आठवड्याला दोनपेक्षा जास्त शारीरिक शिक्षणाचे तास असणाऱ्या शाळांमधील मुलांची तंदुरुस्ती अधिक चांगली आहे. पाचपैकी दोन मुलांचा बीएमआय निरोगी नाही, चारपैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही, तीनपैकी एका मुलामध्ये शरीराच्या खालच्या भागात अपेक्षित ताकद नाही, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचे नमूद करण्यात आले.