प्रतिनिधी
पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेने दिल्लीनंतर सांगलीत छापे टाकून मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. दिल्लीत केलेल्या कारवाईत पोलिसांनी ९७० मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्लीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. दिवेश चिरंजीत भुटिया, संदीप राजपाल कुमार (दोघे रा. नवी दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मेफेड्रोन निर्मती करणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटीज कंपनीचे मालक भिमाजी उर्फ अनिल परशुराम साबळे (वय ४५), अभियंता युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४०) यांना अटक केली. यापूर्वी गुंड वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४२, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), हैदर नुर शेख (वय ४०,रा. विश्रांतवाडी), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५) यांना अटक करण्यात आली होती. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया यांना सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
शेखने विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात मेफेड्रोन लपविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. विश्रांतवाडीतील गोदामातून ५५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. आरोपी माने, शेख, करोसिया यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटरज कंपनीतून मेफेड्रोन तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत छापा टाकून ११०० कोटी रुपयांचे ५५० किलो मेफेड्रोन जप्त केले. चौकशीत पुण्यातून दिल्लीत मेफेड्रोन विक्रीस पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांची दोन पथके दिल्लीला रवाना झाली.. दिल्लीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ९७० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
दिल्लीतील कुरिअर कंपनीमधून लंडन मेफेड्रोन पाठविण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीमधून एकुण मिळून साडेतीन हजार कोटीं रुपयाचे १७०० किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. याप्रकरणी आठ जणांना पकडण्यात आले. आरोपींमध्ये एका अभियंत्याचा (केमिकल इंजिनिअर) समावेश आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे पोलिसांची पथके देशाभरातील १२ ते १५ शहरात तपास करत आहेत. सांगलीत पुणे पोलिसांच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे. सांगलीत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचे धागेदोरे परदेशात असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त केला असून फेड्रोन तस्करीत आंतराष्ट्रीय पातळीवरील बडे तस्कर सामील असल्याचा संशय आहे. मेफेड्रोन तस्करीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहे. पोलिसांनी परराज्यात तपासासाठी पथके पाठविली आहेत. परराज्यात तपासासाठी केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेण्यात येणार आहे.