निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन*

Uncategorized

पुणे, दि.२८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २१ विधानसभा स्तरावरील निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या समन्वयक ज्योती कदम यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी श्रीमती कदम यांनी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी, तालुका स्तरावर आचारसंहिता पथक तयार करणे, आचारसंहितेच्या तक्रारींच्या निवारणासाठी दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देणे, आचारसंहिता जाहीर झाल्याबरोबर सर्व जाहिरात फलक, राजकीय फलक हटवण्याबाबत करावयाची कार्यवाही, मतदान केंद्राच्या १०० मीटर कार्यक्षेत्रात करावयाची कार्यवाही, उमेदवारी दाखल करताना वाहनांचा वापर, उमेदवारी दाखल करताना सोबत असलेल्या व्यक्तींची संख्या तसेच निवडणूक काळात शासकीय अधिकाऱ्यांचे वर्तन आदींबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणास फिरते निरीक्षण पथक, विडीओ निरीक्षण पथक, स्थीर निरीक्षण पथक, व निवडणूक खर्च पथकाचे प्रतिनिधी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.