प्रतिनिधी
टास्क फसवणुकीतील आरोपीला अपहार केलेल्या रक्कमेतून सोने खरेदी करणे महागात पडले आहे. त्याच माहितीच्या आधारे बोरिवली पोलिसांनी त्याला मालाडमधून अटक केली. मोहम्मद इम्रान जमाल मोहम्मद (५०) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे.
तक्रारदार बोरिवली पोलिसांच्या हद्दीत राहतात. त्यांना व्हाट्सअपवर, जीबीएल डिजिटल मार्केटिंगमधून बोलत आहे असे भासवून नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. वेगवेगळे ऑनलाईन टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगून त्यातून मिळणारी रक्कम काढून घेण्यासाठी पैसे भरावे लागतील किंवा अन्य कारणे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये साडेसात लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी बोरिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, बोरिवली पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तपास सुरु केला.
तपासात फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी ५ लाख ९१ हजार रुपये आयसीआयसीआय बँकेत हस्तांतरीत झाल्याचे दिसून आले. हाच धागा पकडून बँक खात्याची माहिती घेताच, आरोपींनी मालवणीतील मार्वे रोड परिसरातून सोने खरेदी केल्याचे उघड झाले. सराफाच्या दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवून पोलीस मोहम्मद इम्रान जमाल मोहम्मद नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहचले. त्याने दोन ठिकाणांहून सोने खरेदी केले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.