प्रतिनिधी
चोरीच्या वाहनाचा शोध घेत असताना संशयित वाहनासह सापडला खरा पण, त्याच्या बरोबर एक अल्पवयीन मुलगीही. ती कोण, कुठली याची चौकशी केली असता त्या मुलीलाही १० वर्षांपूर्वी पळवून आणून संशयिताने स्वत:बरोबर ठेवले होते. पोलिसांनी तपास करुन तिला मूळ पालकांच्या ताब्यात दिले. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे कथानक साक्री येथील एका मुलीच्या बाबतीत घडले.
पुण्याच्या शिरूर परिसरातील लक्ष्मण तांबे यांचे चारचाकी वाहन चोरीस गेले होते. याबाबत पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ही गाडी चोरणारा एका मुलीसह सप्तश्रृंगी गडावर येणार असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. त्या माहितीनुसार वणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. त्याने चारचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याने अनिल वैरागकर (रा. कौटा) हे नाव सांगितले. त्याच्या बरोबर एक मुलगी होती. तिची चौकशी केली असता तिने संशयित आपले वडील असल्याचे सांगितले. मात्र दोघांच्या बोलण्यात तफावत आढळल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता अनिलने धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरातून १० वर्षांपूर्वी संबंधित मुलगी पाच वर्षांची असताना पळवून नेल्याचे सांगितले. वणी पोलिसांनी मुलीच्या पालकांशी संपर्क केल्यावर साक्रीहून मुलगी रुपालीच्या आईने रुपाली आपली मुलगी असल्याचे सांगितले. वणी येथे येऊन रुपालीच्या पालकांनी तिला ताब्यात घेतले.