घाटकोपरमध्ये बंदुक विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक
1 min read

घाटकोपरमध्ये बंदुक विकण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक

प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमधून मुंबईत शस्त्रास्त्र विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेने घाटकोपर येथे अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून एक बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक व्यक्ती शस्त्रास्त्र विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा येथे सापळा रचला. एक व्यक्ती येथे संशयास्पद हालचाली करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तत्काळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे एक बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे सापडली.

हसमतअली शेख असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडी येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी ही बंदुक उत्तर प्रदेशमधून आणल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.