प्रतिनिधी
मेडिकलशी संलग्नित परिचर्या महाविद्यालयातील ऋतुजा बागडे (१९, रा. भंडारा) या बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे पुढे आल्यावर वसतिगृहातील इतर विद्यार्थी घाबरले. सुमारे ९० टक्के विद्यार्थिनी वसतिगृहातून स्वत:चे घर गाठल्याने शेवटी महाविद्यालयाकडून उन्हाळी सुट्टी जाहीर केली गेली.
ऋतुजा ही मेडिकलमधील बी.एस्सी. नर्सिंगच्या प्रथम वर्षाला होती. बुधवारी सकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आल्यावर वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांना मानसिक धक्काच बसला. विद्यार्थिनीचे पार्थिव शवविच्छेदनानंतर बुधवारी घरी पाठवल्यावर वसतिगृहातील इतर विद्यार्थी मानसिक धक्क्यात होते. त्यांनी महाविद्यालयातील शिक्षकांना सुट्टी मागून घरी परतने सुरू केले. गुरुवारी सकाळपर्यंत ९० टक्के विद्यार्थी वसतिगृह सोडून घरी परतल्याचे पुढे आले. या विषयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक झाली. त्यात मुलांना मानसिक धक्क्यातून बाहेर येण्यासाठी काही वेळ देणे आवश्यक असल्याचे पुढे आहे. त्यामुळे शेवटी महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची नियमावली वाचून उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या एका खोलीसह ती अभ्यास करत असलेल्या वसतिगृहातील तिच्या मैत्रिणीची दुसरी खोली अशा दोन्ही खोल्यांची पोलिसांनी तपासणी केली. तर महाविद्यालय प्रशासनानेही विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यात प्राथमिक दृष्ट्या आत्महत्या केलेली ऋतूजा अभ्यासात हुशार होती. एक, दोन दिवसांपूर्वी तिने काही विद्यार्थिनींना मला एकटे वाटत असल्याचे बोलून दाखवले होते. त्यामुळे या बोलण्याचा या घटनेशी काही संबंध आहे काय? हेही पोलिसांकडून तपासले जाण्याची शक्यता आहे.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या एक खोलीसह ती अभ्यास करत असलेल्या वसतिगृहातील तिच्या मैत्रिणीची दुसरी खोली अशा दोन्ही खोल्या वसतिगृह प्रशासनाने पोलिसांच्या सूचनेवरून कुलूप बंद केल्या आहे. तर येथील मोबाईलसह तिच्या पुस्तकांचीही पोलिसांकडून सखोल तपासणी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे