मेहकर इंटरचेंज येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.

राजकीय

बुलडाणा, दि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण होत असलेल्या हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याची आज पाहणी केली. यादरम्यान जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार अॅड. आकाश फुंडकर, संजय रायमूलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालवत मेहकर इंटरचेंज गाठले. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. या ठिकाणच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जिल्ह्यात महामार्गावर मेहकर आणि देऊळगाव राजा येथे दोन इंटरचेंज देण्यात आले आहे. जिल्ह्यात 89 किमीचा मार्ग उभारण्यासाठी आला आहे. हा मार्ग जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे. या मार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर त्यांनी सिंदखेड राजाकडे प्रयाण केले.