प्रतिनिधी
माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अकोला येथून सुमित दिनकर वाघ (२६) याला अटक करण्यात आली आहे. त्याने मुख्य आरोपी शुभम लोणकरच्या सांगण्यावरून आरोपींच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केल्याचे उघड झाले आहे. तो शुभमचा चांगला मित्र असून त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले आहे.
गुन्हे शाखा बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत असून आतापर्यंत २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच कटातील आरोपींचा बँक खात्यात वाघने रक्कम हस्तांतरित केल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आले. वाघ हा मूळचा अकोला येथील अकोटचा रहिवासी आहे. त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार वाघने कर्नाटक बँक खाते वापरून हल्लेखोर गुरूमेल सिंहचा भाऊ नरेशकुमार, अटक आरोपी रुपेश मोहोळ आणि हरीशकुमार यांना रक्कम हस्तांतरित केली. अटक आरोपी सलमान व्होरा याच्या नावाने नवीन खरेदी केलेल्या सिमकार्डवरून इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. शुभम लोणकरच्या सांगण्यावरून तो सर्व व्यवहार करीत होता. व्होरा याच्या नावानेच बँक खाते उघडण्यात आले होते. वाघ आणि शुभम दोघेही अकोटचे रहिवासी असून ते चांगले मित्र आहे. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहे.