प्रतिनिधी
नागपूर शहर आणि ग्रामीण भागात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार हा घातवार ठरला आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत, मंगळवारी सकाळीच दहा वाजता सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी जाणारी बस उलटल्याने एक विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. बसमधील शिक्षिकेसह अन्य ४४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. हा अपघात पेंढरी-देवळी परिसरातील वळणावर झाला. निर्वाणी ऊर्फ सई बागडे (१६) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
दुसऱ्या घटना हा खैरी मार्गावरील कामठी-नागपूर महामार्गावरील महिंद्रा शोरूमसमोर झाला.पुलाखाली उभ्या असलेल्या क्रेनला भरधाव ऑटोने धडक दिली. या विचित्र अपघातात ऑटोतील दोन महिला जागीच ठार झाल्या तर ऑटोचालकासह सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निर्मला लक्ष्मण जुमडे (५०, रा तांडापेठ, वैशालीनगर) आणि कौशल्या कुहीकर (६०, प्रेमनगर) असे अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. तर ऑटोचालक सतीश गोमकाळे, दुर्गा नरेंद्र वैरागडे (६०, तांडापेठ), बेबीबाई मोतीराम आसोले (६०,तांडापेठ), इंदूमती भैसारे (६०, वैशालीनगर), विमला गोपाल धने (६०, तांडापेठ), रेखा पराते (६०, चंद्रभागानगर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
एका लग्न समारंभात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी निर्मला जुमडे, कौशल्या कुहीकर , दुर्गा वैरागडे, बेबीबाई आसोले , इंदूमती भैसारे, विमला धने आणि रेखा पराते यांना जायचे होते. त्यांनी ऑटोचालक सतीश गोमकाळेने मगंळवारी सांयकाळी पाच वाजता खैरी मार्गाने जात असताना महिंद्रा शोरूमसमोर उभ्या असलेल्या क्रेनला भरधाव ऑटो धडकवला. या अपघातात निर्मला आणि कौशल्या या दोघीही जागीच ठार झाल्या. तर ऑटोचालक सतीशसह अन्य पाच महिला गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच नागरिकांनी ऑटोतील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नवीन कामठी पोलिसांनी आरोपी ऑटोचालक सतीश गोमकाळेविरुद्ध हयगयीने वाहन चालवून दोन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल केला. अपघातास कारणीभूत ठरलेली क्रेन रस्त्याच्या मधोमध उभी होती. त्यामुळे क्रेनचालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
भरधाव कार अनियंत्रित झाल्यानंतर रस्त्यावरील कठड्याला (रेलिंग) धडकली. या विचित्र अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मित्र गंभीर जखमी झाले. ही घटना कामठी-नागपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, लोखंडी दांडा कारच्या समोरील भागातून शिरून आरपार मागच्या भागातून बाहेर निघाली़ या अपघातात रोशन निलांबर नाइक (२६, रा़ तिरंगा चौक, रामगड, नवीन कामठी) हा ठार झाला तर सय्यद आमीर शहजाद सय्यद साबीर (२६, फुटानाओळी, कामठी) व अभिषेक शिवनारायण परमान (२८, रा़ नवीन येरखेडा, दुर्गा सोसायटी, कामठी) हे दोघे गंभीर जखमी झाले़.