धक्कादायक! बदनामी केली म्हणून महिलेचा खून…

क्राईम

प्रतिनिधी

बदनामी केली म्हणून संतप्त होण्याचा प्रकार नवा नाही.पण थेट खून करण्याची मानसिकता अफलातूनच. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरात रहस्य सापडले. खेक शिवारात जंगल परिसरात अज्ञात महिलेची कवटी व हाड, कपडे, दागिने, मेडिकल पट्टा असे साहित्य दिसून आले होते.

गिरड पोलिसांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ही घटना दिसली. प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सूरू झाला. घटना संशयास्पद दिसली. पोलिसांची चक्रे वेगाने फिरली. याच काळात दारोडा येथील गीता नंदकिशोर सावळे ही महिला हरविली असल्याची नोंद वडनेर पोलिसांत असल्याचे पुढे आले.

ही तक्रार २० सप्टेंबर २०२४ रोजी दाखल झाली.५५ वर्षीय ही महिला चंद्रपूर येथील मूळची असून ती दारोडा येथे सध्या मुक्कामी असल्याचे स्पष्ट झाले. हरविली असतांना तिच्या अंगावर असलेले कपडे व घटनास्थळी असलेले कपडे सारखेच असल्याचे उघड झाले.

त्यामुळे तो मृतदेह गीता साळवे हिचा असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मृत महिलेचे पती नंदकिशोर साळवे यांनी तक्रार दिली. आरोपी सुरेश बावणे याचे गावातील एका महिलेसोबत अवैध संबंध आहेत अशी बदनामी कां केली, असा संशय घेत व त्याचा राग ठेवून खून केल्याची तक्रार पती साळवे यांनी केली होती. मग खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपासात तांत्रिक पुरावे जमा करण्यात आले. तेव्हा झाल्या घटनेच्या दिवशी मृत महिला व आरोपी सुरेश बावणे हे दोघे सोबत असल्याचे स्पष्ट झाले.

तेव्हा बावणे यास ताब्यात घेऊन विचारपूस सूरू झाली. तेव्हा आरोपी सुरेश बावणे याने आपला गुन्हा कबूल करून टाकला. तपासात आरोपी बावणे याचे मृत महिलेशी प्रेम संबंध असल्याचे दिसून आले. त्याचे परत एका दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे आरोप मृत महिलेद्वारे पूर्वी होत होते.ते पाहून आरोपीने गीता हिला गोड बोलून खेक शिवारात नेले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिच्या गळ्यावर चाकूने वार करीत खून केला, असे दिसून आले.

पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, यांचे या तपासात मार्गदर्शन घेत गिरडचे ठाणेदार संदीप गाडे, वडनेर ठाणेदार लक्ष्मण लोकरे, सायबर सेलचे भुजाडे, अनुप कावळे, गोविंद मुंडे, गो्मेद पाटील, असीम शेख, अनुप टपाळे, मंगेश हेमके यांच्या चमुने कारवाई केली आहे.