प्रतिनिधी
गृहपाठ देण्याच्या बहाण्याने ८ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५४ वर्षीय शिक्षकाला कांजुरमार्ग पोलिसांनी अटक केली. आरोपी नवी मुंबईतील रहिवासी असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कांजुरमार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७५ व पोक्सो कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार शुक्रवारी हा प्रकार घडला. शुक्रवारी सायंकाळी पीडित मुलगी घरी परतली असता ती रडू लागली. तिच्या आईने तिला त्याबाबत विचारले असता गणिताच्या तासाला शिक्षकांनी स्वाध्याय व गणिताचे प्रश्न सोडवण्याच्या बहाण्याने पीडित मुलीशी अश्लील कृत्य केल्याचे तीने सांगितले.
अखेर मुलीच्या आईने याप्रकरणी स्थानिक कांजूरमार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी प्रकणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी शिक्षकाला शनिवारी याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.