प्रतिनिधी
‘जनता न्युज @newjanta6274’ या ट्विटर (X) हँडलवरून विविध नागरिकांचे आणि नामवंत व्यक्तींचे फोटो वापरून खोटी, अपमानकारक व तथ्यहीन माहिती पसरवली जात आहे. या अकाउंटवरून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींनी अवैध धंदे चालवत असल्याचे खोटे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व आरोप बनावट असून, यामुळे संबंधित व्यक्तींसह स्थानिक पोलीस यंत्रणेचीही खोटी बदनामी होत आहे.
विशेष म्हणजे, या ट्विटर हँडलवरून खोटी व चुकीची माहिती देऊन पोलीस प्रशासनाला भुलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये काही गुन्हेगार व्यक्ती स्वतःला सुधारणारा दर्शवून आपली प्रतिमा सुधारण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत. याशिवाय, त्यांनी वारंवार अशा खोट्या पोस्ट टाकून इतर प्रतिष्ठित नागरिकांना धमकावण्याचं काम सुरू ठेवलं आहे.
ही ट्विटर प्रोफाइल एका स्वयंघोषित डिजिटल मीडियाच्या नावाने चालवली जात असून “जनता न्युज” हे नाव वापरण्यात आले आहे. परंतु विश्वसनीय सूत्रांच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे की, या माध्यमाची ना National Informatics Bureau (NIB) ना Information and Broadcasting Ministry यांच्याकडे कोणतीही अधिकृत नोंदणी नाही. त्यामुळे हा डिजिटल मीडिया गाईडलाईन्स 2021 आणि 2023 चा स्पष्ट उल्लंघन असल्याचे दिसून येते.
तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. सदर ट्विटर हँडल हे कृष्णा सिंग मुद्रिका या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. कृष्णा सिंग मुद्रिका हा मुंबई येथून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार असून, तो देशभरात दुसऱ्याच्या नावाने बनावट अकाउंट्स तयार करून समाजात द्वेष पसरवणाऱ्या, अफवा पसरवणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या कारवायांमध्ये सक्रिय आहे.
या प्रकारामुळे अनेक प्रतिष्ठित नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला असून, त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
सदर घटनेनंतर संबंधित नागरिकांनी पोलिस प्रशासनाला पुढे मागण्या केल्या आहेत:
• ट्विटरवरील @newjanta6274 या हँडलचा त्वरित तपास करण्यात यावा.
• कृष्णा सिंग मुद्रिका याच्यावर IT Act 2000, IPC कलम 499, 500 (बदनामी) तसेच 66C, 66D (सायबर गुन्हे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
• सदर खोट्या पोस्ट्स त्वरित हटवून हे ट्विटर हँडल कायमचे बंद करण्यात यावे.
• अशा अप्रमाणित डिजिटल मीडियावर कठोर नियंत्रण आणावे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही.
या प्रकरणी प्रशासनाकडून लवकरात लवकर कडक पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे.