प्रतिनिधी
– युनिट-४ गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २ गुन्हे उघडकीस, २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरातील युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या एका विधीसंघर्षित अल्पवयीन गुन्हेगारास अटक करत ०१ दुचाकी व ०१ रिक्षासह एकूण ₹२.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत २ गुन्हे उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-४ कडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेशानुसार घरफोडी, मोबाईल चोरी, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, एनडीपीएस, जुगार, एमपीडीए, मोक्का प्रकरणातील आरोपींवर लक्ष ठेवून कारवाई सुरू होती.
याच दरम्यान, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील विश्रांतवाडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम व त्यांच्या पथकास गुप्त बातमीदाऱ्यामार्फत माहिती मिळाली की, जयवंत सोसायटी येथे घरफोडी करणारा एक आरोपी कॉमर्सझोन चौकाजवळ उभा आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या आदेशानंतर त्वरित कारवाई करत युनिट-४ च्या पथकाने त्या इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने स्वतःचे नाव ऐश्वर्य भरत कांबळे (वय १७ वर्षे ९ महिने, रा. गंगानगर, हडपसर, पुणे) असे सांगितले. अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना समक्ष बोलावून त्यांच्यासमोर चौकशी केली असता आरोपीने दोन घरफोड्यांची कबुली दिली.
दोन गुन्ह्यांची कबुली
१. पहिला गुन्हा:
सुमारे आठ ते नऊ दिवसांपूर्वी ऐश्वर्य कांबळे व त्याचे साथीदार निखिल ऊर्फ बारक्या आव्हाड आणि दीपक दिलीप कसबे यांनी जयवंत सोसायटी, विश्रांतवाडी येथे घरफोडी करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरले. घरफोडी करताना त्यांनी गंगानगर येथून ‘Achiever’ दुचाकी चोरी करून ती वापरली होती.
सदर प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १९६/२०२५ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल आहे.
२. दुसरा गुन्हा:
दिनांक २६ जुलै २०२५ रोजी लेन नं. १५ गंगानगर हडपसर येथून MH-12-GS-6546 ही रिक्षा चोरी करून टिंगरेनगर लेन नं. १०, विश्रांतवाडी येथे बंद घरात घुसून ०९ घड्याळे व ०२ मोबाईल चोरले. गुन्हा केल्यानंतर ती रिक्षा पुन्हा पार्क केली.
सदर प्रकरणी गुन्हा रजि. नं. १९९/२०२५, कलम ३३१(१), ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा नोंदवलेला आहे.
पंचांसमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी छोटी कातरी व एका हातात काळ्या रंगाचे घड्याळ (किंमत ₹१५,०००/-) सापडले.
तसेच गुन्ह्यात वापरलेली:
दुचाकी: ₹१,००,०००/-
रिक्षा: ₹१,५०,०००/-
घड्याळ: ₹१५,०००/-
एकूण मुद्देमाल किंमत: ₹२,६५,०००/-
ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. विवेक मिसाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे व त्यांच्या पथकाने केली.
कारवाईत सहभागी अधिकारी/कर्मचारी:
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर कदम
पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम
पोलीस हवालदार: अमजद शेख, सुभाष आव्हाड, अजय गायकवाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, वैभव रणपिसे, जहांगीर पठाण
मपोशि: देविदास वांढरे, पांढरकर (४१९८), नलावडे (९३०६), शरद झांजरे
पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे पुणे शहरात वाढत असलेल्या घरफोडी व वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल. अल्पवयीन गुन्हेगारांकडून अशा प्रकारचे सराईत गुन्हे होत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे. पुढील तपासासाठी आरोपीस विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.