प्रतिनिधी
सहकारनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन व्यक्तींनी पोलीस असल्याचे भासवून एका लॉजमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाची फसवणूक केली.
घटनेत आरोपींनी साध्या कपड्यांत येऊन पीडित तरुणाला थांबवलं. त्यानंतर कारमध्ये बसवून खोटा अटकप्रसंग रचला. आरोपींनी तरुणावर दबाव टाकून त्याच्याकडून मोबाईलद्वारे युपीआय (UPI) व्यवहारातून तब्बल सहा हजार रुपये उकळले.
या घटनेनंतर तरुणाने धीर गोळा करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सहकारनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपास सुरू केला असून, आरोपींच्या बँक खात्यांची माहितीही हस्तगत केली आहे. लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, कोणीही ओळखपत्र न दाखवणाऱ्या किंवा संशयास्पद पद्धतीने वागत असलेल्या व्यक्तींवर त्वरित शंका घ्या आणि पोलिसांशी संपर्क साधा.