गोठ्यात अवैध गर्भलिंग-निदान केंद्र, दोन जण अटकेत
प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील नांजा वाडी येथे एका पत्र्याच्या गोठ्यात अवैध गर्भलिंग-निदान केंद्र चालवले जात असल्याचा पर्दाफाश झाला असून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. छाप्यात पोर्टेबल अल्ट्रासाऊंड उपकरण, गर्भपातासाठीच्या गोळ्या, मोबाईल फोन आणि रुग्णांचे संपर्क यासंबंधीचे कागदपत्रे जप्त करण्यात आली. तपासात अटक झालेल्या दोघांकडे कोणतीही वैद्यकीय पात्रता नसल्याचे स्पष्ट झाले असून एक जण फक्त १२वी उत्तीर्ण तर दुसरा पॅथॉलॉजी लॅब मालक असल्याची माहिती मिळाली. छाप्यावेळी काही गर्भवती महिलाही तिथे आढळून आले, ज्यामुळे हे केंद्र प्रत्यक्षात कार्यरत असल्याचे निश्चित झाले आहे.
या प्रकरणात आरोपींवर Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (PCPNDT) Act अंतर्गत कलम 3A (लिंग-निवड मनाई), कलम 4 (अनधिकृत निदान प्रक्रिया), कलम 5 (गर्भलिंगाची माहिती देण्यास मनाई), कलम 6 (Sex Determination ला संपूर्ण बंदी), कलम 23(1) (अवैध तपासणी) आणि कलम 25 (नोंदणी नसलेल्या उपकरणांचा वापर) अशी तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. तसेच अनधिकृत गर्भपातासंदर्भात Medical Termination of Pregnancy (MTP) Act च्या तरतुदी लागू होतात, ज्या अंतर्गत वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तीकडून गर्भपात करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.
याशिवाय IPC 312 (अनधिकृत गर्भपात), IPC 314 (जीवितास धोका निर्माण करणे), IPC 417 (फसवणूक), IPC 420 (आर्थिक फसवणूक) आणि IPC 120B (कटकारस्थान) अशा कलमांचीही नोंद करण्यात आली असून या रॅकेटच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांत किती महिलांची तपासणी आणि गर्भपात झाले याचा तपास सुरु आहे. तपास यंत्रणा इतर व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यताही तपासत आहे.
