प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबूत येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १06 वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत समाजपरिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण जागवली.
या कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या साहित्याचा प्रभावीपणे वापर केला. त्यांच्या विचारांचा वारसा आजच्या तरुण पिढीने जपण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत, गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध क्षेत्रात यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक, शिक्षक आणि त्यांच्या अथक परिश्रमांचे मोठे योगदान असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव पाहायला मिळाले. हा सत्कार त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शशिकांत बनसोडे यांनी केले. तर कैलास खंडाळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक, विद्यार्थी, पालक आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर समाजात कायम राहावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून नवी पिढी घडावी, हा संदेश देणारा हा कार्यक्रम निंबूत परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला.












