मुख्य मजकुरावर जा
Friday, 4 September 2026

शाळा-महाविद्यालय परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर चार ठिकाणी कायदेशीर कारवाई; तंबाखूजन्य पदार्थ जप्त.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 4, 2026 1 मिनिट वाचन 3,502 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये तसेच विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गुरुवारी दि.३ सप्टेंबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

सायंकाळी ४ ते ६ या वेळेत राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान पोलीस पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव निंबाळकर,कोऱ्हाळे, करंजेपुल आजुन विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील टपऱ्या, पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच इतर विक्री केंद्रांची तपासणी केली. शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड(९१ मीटर) परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३ (COTPA Act) मधील तरतुदींनुसार चार ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान संबंधित विक्रेत्यांकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे . शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा विक्रीला कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे.

दरम्यान शाळा व महाविद्यालयांच्या १०० यार्ड (९१ मीटर )परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नयेत असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांनी नागरिक, पालक, शाळा व्यवस्थापन तसेच दुकानदारांना केले आहे. तसेच अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे किंवा उपलब्ध करून देणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शाळा-महाविद्यालय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनीही तंबाखूमुक्त शैक्षणिक परिसर निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जिवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अजर मुलानी आणि त्यांच्या टीम ने केली आहे .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख